पक्षीनिरीक्षणाची सुरुवात: पक्षी कसे ओळखावेत?

Written By Parag Kokane on January 26, 2014 | 6:16 PM

पक्षीनिरीक्षण (बर्डिंग) हा निसर्गाशी जवळीक साधणारा आणि अनंत संधी पुरवणारा एक आकर्षक छंद आहे. "पक्षी निरीक्षण" चा अर्थ नुसतेच "पक्षी बघणे" असा नसून, "पक्ष्यांचे अभ्यासपूर्ण आणि लक्षपूर्वक निरीक्षण करणे" असा आहे. बरं, पक्षी बघण्यासाठी दरवेळी जंगलातच जावे लागते असंही नाही! पक्षी अक्षरशः कुठेही दिसू शकतात - झाडाझुडपात, शेतात, पाणवठ्यावर, पठारावर, बागेत, एखाद्या ट्रेकिंग मार्गावर किंवा अगदी रहदारीच्या रस्त्यांवर सुद्धा पक्षी आपल्या सभोवताली असतात. प्रत्येक जातीचा पक्षी आपल्या स्वत:च्या विविधतेसह, "अद्वितीय" असतो. पक्षीनिरीक्षणाच्या जगात पाऊल ठेवणाऱ्या नवशिकाऊंना/अमेच्युर्सना, पक्षी ओळखणे अवघड काम वाटू शकते. परंतु, काही मुख्य बाबी लक्षात घेतल्यावर आणि योग्य सरावानंतर, तुम्ही लवकरच अनुभवी पक्षीनिरीक्षका प्रमाणे (बर्डवॉचरसारखे) पक्षी ओळखू शकाल. ह्या लेखातून अशाच काही बाबींचा थोडक्यात उलगडा केला आहे.

पूर्वतयारी

पक्षीनिरीक्षणाला निघण्याआधी तुमच्याकडे पक्षीनिरीक्षणासाठी लागणारी योग्य ती साधन हवीत. एक चांगली दुर्बीण तुम्हाला पक्ष्यांना जवळून पाहण्यास मदत करते. दुर्बिणीमुळे तुम्हाला पक्षी बघायला पक्ष्यांच्या खूप जवळ जायची गरज तर लागत नाहीच पण त्यामुळे पक्षी घाबरून उडून जायचा धोकाही टळतो. 8x ते 10x रेंज असलेली दुर्बीण पक्षी निरीक्षणासाठी पुरेशी आहे.

त्याच बरोबर एक तरबेज पक्षीनिरीक्षक आणि एखाद पक्षी ओळखण्यासाठी पुस्तक/मार्गदर्शक/मोबाईल अ‍ॅप जवळ असणं आवश्यक आहे. वेगवेगळ्या जातींचे पक्षी, त्यांची माहिती, छायाचित्रे, आवाज वगैरे ओळखण्यासाठी मोबाईल अ‍ॅप/मार्गदर्शक पुस्तकांची खूप मदत होते.

निरीक्षण कसे करावे?

एखादा अनुभवी पक्षी निरीक्षक अगदी पटापट पक्ष्यांची ओळख करून नोंदी करून घेताना तुम्ही बघितलं असेल. "कसं काय बरं ह्याला जमतय ओळखायला?" असा अनेकदा प्रश्नही पडला असेल! पक्षी ओळखणं खरंच वाटत तेवढं कठीण काम आहे का? तर नाही! पक्ष्याचे निदान करण्यासाठी काही बाबींची बारकाईने नोंद घ्यावी लागते इतकेच. उदाहरणार्थ -

  • पक्ष्याची शरीर रचना किंवा आकार काय आहे
  • पक्ष्याचा रंग
  • खाद्य
  • पक्ष्याच्या हालचाली किंवा वर्तन
  • पक्ष्याचे आवाज
  • अधिवास
  • चोचीचा, शेपटीचा आकार इत्यादी

पक्षी ओळखताना सर्वात महत्वाचे आहे ती तुमची अचूक निरीक्षणक्षमता आणि त्याप्रमाणे तुम्ही केलेल्या नोंदी. पक्षी बघताना - पक्ष्याच्या आकारावर, शरीर रचनेवर, आणि त्यांच्या हालचालीवर मुख्यत्वे लक्ष द्या. तो आकाराला चिमणी एवढा छोटा आहे का आकाराने गरुडासारखा मोठा आणि चपळ शरीराचा आहे? चोच वक्राकार आहे कि भाल्यासारखी आहे? अशा अनके गोष्टींची आणि वैशिष्ट्यांची नोंद ठेवा. पक्ष्याच्या हालचालीकडे, ते काय खात आहेत किंवा उडण्याची पद्धत वगैरे इतर गोष्टी पक्ष्यांचे अचूक निदान करण्यासाठी मार्गदर्शन करू शकतात.

निरीक्षणाची वेळ

बहुतेक दिनचर पक्षी हे सकाळी उजाडल्यावर लगेच आणि सायंकाळी मावळायच्या थोडं आधी खूप सक्रिय असतात. त्यामुळे साधारणपणे सकाळी ६:३० ते ८:३० आणि सायंकाळी ४:०० ते ६:०० ह्या पक्षी निरीक्षणासाठी योग्य वेळा आहेत. निशाचर पक्षी बघण्यासाठी किंवा त्यांचे आवाज ऐकण्यासाठी मात्र तुम्हाला रात्रीचेच बाहेर पडायला हवे. विविध प्रजातींना बघण्यासाठी दिवसाच्या उत्तम वेळा, हवामान आणि इतर परिस्थितींची माहिती करून घेतली तर त्याचा निरीक्षणासाठी फायदा होईल.

निरीक्षणा दरम्यान करावयाच्या नोंदी

संभाव्य पक्ष्यांची यादी तयार करण्यासाठी आपण कोणत्या अधिवासात जाणार आहोत ह्याची माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यानुसार पक्ष्यांचे - माळरानातले, समुद्री, पाणवठ्यावरचे, डोंगरदऱ्यांमधले, घनदाट जंगलातले असे वर्गीकरण करून घेता येऊ शकते.

त्यानंतर नोंद करा "पक्ष्याच्या आकाराची". आकाराची नोंद करताना, तुम्हाला माहित असलेल्या पक्ष्यांना डोळ्यासमोर ठेऊन दिसलेल्या पक्ष्याची तुलना करावी. म्हणजे दिसलेला पक्षी हा तुलनेने चिमणी, मैना, कावळा ह्यांच्या पेक्षा लहान आहे, तेवढाच आहे का मोठा आहे वगैरे.

आकार लक्षात घेतल्यानंतर, नोंद करा "पक्ष्याच्या रंगाची". काही पक्षी हे बहुरंगी असू शकतात अशा वेळी पक्ष्याचा मूळरंगाची नोंद करावी. त्याबरोबरच, पर्यायी पक्ष्याचा आवाज, उडण्याची पद्धत (उदा. पंख न हलवता तरंगणे, जलद झेप घेणे, सरळ उड्डाण वगैरे) अशा काही इतर महत्वाच्या गोष्टी नोंदून ठेवा.

चोचीचा आकार बघताना - मासे पकडता येण्यासारखी, चिखलातून अन्न शोधण्यासारखी, लाकूड तासण्यासारखी, फुलातील मधुरस शोषण्यासाठी, बिया किंवा कठीण फळे फोडून खाण्यासारखी, मांस फाडून खाण्यासारखी वगैरे असे वर्गीकरण करून ठेवा.

पक्ष्याचे आवाज काळजीपूर्वक ऐका!

पक्ष्याचे आवाज हे मुळात दोन प्रकारात विभाजित केलेले आहेत - ओरडणे(कॉल) आणि गाणी (सॉंग्स). पक्ष्यांचे हेच आवाज, आपल्याला पक्ष्यांच्या उपस्थितीची प्रथम सूचना देतात. पक्षी अनेक प्रकारचे वेगवेगळे आवाज काढतात, जे तुम्हाला पक्षी दिसत नसतानाही पक्षी ओळखण्यास मदत करू शकतात. आवाजांवरून पक्षी ओळखणे थोडं कठीण आहे, परंतु सरावाने तुम्ही विविध प्रजातींना त्यांच्या आवाजाने ओळखू शकाल. आपल्याकडे अनेक अ‍ॅप्स आणि ऑनलाईन संसाधने आहेत जिथे तुम्ही स्थानिक पक्षी प्रजातींच्या आवाजांना ऐकून त्यांच्याशी परिचित होऊ शकता.

पक्ष्यांचा अधिवास ओळखा!

कुठल्याही गावाच्या, शहराच्या बाहेर असलेली माळरानं, जंगल, नदी, ओढे, धरण, नाले हा अनेक प्रकारच्या पक्ष्यांच्या प्रजातींचा प्रमुख अधिवास आहे. त्यामुळे पक्षी निरीक्षणासाठी जर तुम्ही अशी काही ठिकाणे निवडलीत तर पक्ष्यांच्या अनेक प्रजाती एकाच ठिकाणी बघण्याची संधी उपलब्ध होऊ शकते. अशा विविध अधिवासांमध्ये आढळणाऱ्या पक्ष्यांची आपण आधीच माहिती करून घेतलीत तर प्रत्यक्ष निरीक्षण दरम्यान पक्षी ओळखणे सोप्पं होऊन जातं.

उदाहरणार्थ, सुतार पक्षी सामान्यत: वनक्षेत्रात आढळतात, तर बलाक, करकोचा जातीचे पक्षी पाणथळ भागात आढळतात. तुम्ही ज्या अधिवासात आहात त्याचा आणि तिथे आढळणाऱ्या पक्ष्यांचा अभ्यास करा.

स्स्थलांतरित पक्ष्यांची माहिती मिळवा

वर्षातील ठरलेल्या मौसमात, एका भागातून दुसर्या भागात स्थलांतर करणे हे पक्ष्यांचं खास लक्षण आहे. पक्ष्यांच्या स्थलांतर करण्यामागे - अन्न, हवामान, सवयी, प्रजनन अशी अनेक कारणे असू शकतात. स्थलांतर करत असताना वर्षानुवर्षे ठरलेल्या मार्गावरूनच मार्गक्रमण करताना; पक्ष्यांची थांबा घेण्याची ठिकाण सुद्धा तीच ठरलेली असतात. हिवाळ्यात भारतामध्ये अनेक प्रजातींचे पक्षी स्थलांतर करून येतात तर पावसाळा हा अनेक स्थानिक/स्थलांतरित पक्ष्यांसाठी विणीचा हंगाम असतो.

त्यामुळे पक्षी निरीक्षणास जाताना - कोणते पक्षी वर्षातल्या कोणत्या महिन्यात ठराविक जागेवर दिसू शकतात ह्याचा आधीच अभ्यास करून ठेवला तर त्याचा निरीक्षण क्षेत्रावर तुम्हाला निश्चितच खूप फायदा होईल. त्याशिवाय, प्रत्यक्ष निरीक्षण क्षेत्रावर; पक्षी शोधण्यासाठी एखाद्या मार्गदर्शक पुस्तकाचा किंवा Mobile App चा संदर्भासाठी अवश्य वापर करावा.

NATURE WEB तर्फे विकसित केलेले Indian Birds हे Mobile App नवशिक्या किंवा अनुभवी निरीक्षकासाठी; अनेक वैशिष्ट्ये असलेले उपयुक्त App आहे.

संयम बाळगा!

पक्षी कोणत्याही जलद हालचालीने सहजपणे घाबरतात, म्हणून तुम्ही जेव्हा बाहेर पक्षीनिरीक्षण करत असाल तेव्हा हळूवार आणि शांतपणे चाला. शक्यतो, भडक रंग टाळून तुमच्या आजूबाजूच्या परिस्थितीत मिसळणाऱ्या रंगाचे कपडे घाला. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे "संयम ठेवा"! बहुतांशवेळा तुम्हाला दीर्घकाळासाठी एकाच ठिकाणी स्थिर उभे राहून, पक्षी तुमच्या जवळ येण्याची वाट बघावी लागते.

एखाद्या पक्षीनिरीक्षण समूहात सामील होणे अत्यंत फायदेशीर ठरू शकते. अनुभवी पक्षीनिरीक्षक/बर्डवॉचर्स चांगल्या टिपा देऊ शकतात, नवनवीन पक्षीनिरीक्षण स्थळांविषयी तुम्हाला माहिती मिळू शकते. अनेक समुदाय, पक्षी निरीक्षण सहलींचे आयोजन करतात, अशा सहलींमध्ये सहभागी झाल्याने नवीन गोष्टी शिकण्या बरोबरच, इतर सहकारी पक्षी प्रेमींना भेटण्याची एक उत्तम संधी तुम्हाला मिळू शकते.

योग्य साधने घेऊन, नवीन गोष्टी शिकून, प्रैक्टिस केल्याने, तुमच्या नोंदी जितक्या अचूक होतील तितकंच पक्ष्यांचं निदान करण्यात तुम्ही पारंगत होऊ शकता. पक्ष्यांबद्दल अधिक शिकण्यासाठी, त्यांचे आवाज ऐकण्यासाठी, मराठी इंग्रजी नाव बघण्यासाठी, शास्त्रीय नाव बघण्यासाठी आणि इतरही बऱ्याच गोष्टींसाठी Indian Birds App नक्की वापरून बघा.

SHARE

About Parag Kokane

With my camera and binoculars, I wander through the beautiful landscapes of the Western Ghats, capturing the amazing wildlife and nature around us. On this blog, you'll find exciting wildlife observations, my thoughts on protecting nature, and more. Join me as we explore and help protect the beauty of our world together.

2 comments :

  1. एखादं पक्षी निरीक्षणा वर पुस्तक सुचवाल का, किंवा महाराष्ट्रात आढळणारे पक्षी ह्यावर एखादं पुस्तक सांगा.

    ReplyDelete
  2. पक्षी निरीक्षणासाठी आणि एकूणच पक्ष्यांच्या इत्यंभूत माहिती साठी Birds of the Indian Subcontinent हे पुस्तक उत्तम आहे. ह्यात फक्त महाराष्ट्रच नाही तर भारतातल्या सगळ्याच पक्ष्याची माहिती योग्य प्रकारे मंडळी आहे. ऍमेझॉन वरची पुस्तकाची हि लिंक - https://amzn.to/3hr5n9g

    ह्या शिवाय, तुम्ही NATURE WEB चे Indian Birds हे ऍप सुद्धा वापरू शकता -
    https://play.google.com/store/apps/details?id=com.kokanes.birdsinfo

    ReplyDelete