एप्रिल-मे महिना सुरु झाला कि फेसबुक, इंस्टाग्राम सारख्या माध्यमांमध्ये एका ठराविक सरड्याच्या फोटोंचा पूर यायला सुरुवात होते. हा सरडा म्हणजे Fan-throated Lizard, ज्याला मराठीत "रंगीत गळ्याचा सरडा" असं म्हणतो. दख्खनच्या पठारावरील खडकाळ परिसर या "रंगीत गळ्याच्या सरड्याचा" प्रमुख अधिवास आहे.
दख्खनच्या पठाराची विशेषता
सह्याद्रीच्या उंच डोंगररांगांपासून ते कोकणाच्या समृद्ध किनारपट्टीपर्यंत, आणि विदर्भाच्या उष्ण आणि शुष्क जंगलांपासून ते मराठवाड्याच्या कोरड्या भागांपर्यंत, महाराष्ट्राला कमालीची भौगोलिक विविधता लाभली आहे, त्यातलाच एक महत्वाचा भाग म्हणजे "दख्खनचे पठार". याच्या उत्तरेस सातपुडा आणि विंध्याचल पर्वत रांगा, पूर्वेस पूर्व घाट आणि आणि पश्चिम दिशेला सह्याद्री किंवा पश्चिम घाट अशी रचना असल्याने ह्याचा आकार त्रिकोणी आहे आणि दख्खनचे पठार हे भारतातील सर्वर मोठे पठार आहे.
ह्या विशाल भौगोलिक पठारावर वेगवेगळ्या भागांमध्ये, Fan-throated Lizard च्या "Sarada deccanensis" आणि "Sarada superba" या दोन विशिष्ट प्रजाती आढळतात. "Sarada deccanensis" हि प्रजाती उत्तरपूर्वीय पठार किंवा माळरानावर आढळते तर "Sarada superba" हि सह्याद्री पर्वतरांगापुरती मर्यादित आहे.
वैशिष्ट्यपूर्ण रंगसंगती आणि वर्तन
घरातील पालीपेक्षाही लहान आकार असलेल्या ह्या सरड्याचा, गवताळ माळराने, उघडे बोडके डोंगर, खडकाळ परिसर हा अधिवास आहे. उन्हाळा सुरू झाला की अनेक निसर्ग प्रेमी मंडळी याचा शोध घेण्यासाठी जवळपासच्या टेकड्यांवर, डोंगरांवर ह्यांना शोधू लागतात. हे सरडे आपल्या परिसराशी एकरूप होऊन राहतात, त्यामुळे ह्यांना बघण्यासाठी तीक्ष्ण नजरेची आवश्यकता आहे. वरील फोटोत दिसत असल्याप्रमाणे ह्याच्या मातकट-तपकिरी रंगाच्या पाठीवर काळ्या रंगाची चौकटी नक्षी असते आणि पोटाचा भाग फिकट पिवळसर रंगाचा असून, त्यांना निमुळती लांब शेपटी असते. ह्या सरड्याचे, मागचे पाय हे पुढच्या पायांपेक्षा लांब आणि मजबूत असतात, ज्याचा उपयोग हे मागच्या दोन पायांवर उभे राहून परिसराची टेहाळणी करताना किंवा जमिनीवरून दोन पायांवर धावण्यासाठी करतात.
या सरड्याला "Fan-throated" किंवा "रंगीत गळ्याचा" हे विशेषण लागण्याचे कारण म्हणजे साहजिकच - "नर सरड्याच्या गळ्याचा रंग". एरवी नर आणि मादी सारखेच दिसत असले तरी विणीच्या काळात, म्हणजे साधारण एप्रिल मे महिन्यात, नराच्या गळ्याला आकर्षक रंगाची गुलर पिशवी दिसू लागते. मागील दोन पायावर उभे राहिले असताना किंवा दोन पायांवर जमिनीवरून धावताना गुलर पिशवी जबड्यापासून ते पोटापर्यंत लांब असलेली दिसून येते. गळ्या खाली तयार होणारे ह्या गुलर पिशव्या काळ्या, लाल, निळ्या आणि फिकट पिवळ्या रंगात किंवा कोणत्यातरी एकाच रंगात येतात. विणीच्या काळात, नर सरडा उन्ह डोक्यावर यायच्या थोडं आधी बाहेर पडतात. एखादा दगड किंवा कोणतीही उंच जागा शोधून, त्यावर उभे राहून गुलर पिशवी फुगवून ते स्वत:चे अस्तित्व इतर जोडीदारांना दाखवून देतात. हे करीत असताना नर सरडा मादी जवळपास आहे का, याचाही अंदाज घेतो. मादी टप्प्यात आल्यावर, गळ्याचा आकर्षक पंखा जोरजोरात फडफडवून, नर मादीला स्वत:कडे आकर्षित करतो. अर्थातच बरेचदा आजूबाजूला प्रतिस्पर्धीही असतातच! अशावेळी, दोघे नर दोन पायांवर उभे राहून एकमेकांना आव्हानही देतात.
इतर जीवांप्रमाणेच, विकास आणि वाढत्या मानवी हस्तक्षेपामुळे ह्या सरड्याचे नैसर्गिक अधिवास सुद्धा संकटात आलेत आणि याचा प्रभाव या प्रजातीच्या संख्येवर होतोय. त्यामुळे, या प्रजातीचे संरक्षण आणि त्यांच्या नैसर्गिक निवासस्थानाचे संरक्षण हे अत्यंत महत्वाचे झाले आहे.
Sitana laticeps
खाली दाखवलेली Sitana laticeps हि प्रजाती सासवड भागात अधिक आढळते; ह्या प्रजातीमध्ये नर सरड्यांची गुलर पिशवी फिकट पिवळी किंवा पांढऱ्या रंगाची असते
0 comments :
Post a Comment