फुलपाखरू नैसर्गिक रित्या किती काळ जगू शकतं हे अनेक गोष्टींवर अवलंबून आहे, जसे कि - फुलपाखराचा आकार, प्रजाती, ठिकाण, वर्षातील कोणत्या महिन्यात ते प्रौढावस्थेत येतंय वगैरे वगैरे. तरीही सांगायचंच झाल्यास, फुलपाखरांचं सरासरी आयुष्य हे १ महिन्याचे असते. लहान फुलपाखरांच आयुष्य हे अगदीच कमी म्हणजे एका आठवड्यापुरते असते. त्यातल्या त्यात "मोनार्" जातीची फुलपाखरं ९ महिन्यांपर्यंत जगू शकतात. त्यामुळे, फुलपाखरू जितकं लहान तितकंच त्याचं आयुष्य पण लहान असा एक साधा निष्कर्ष आपण लावू शकतो.
पावसाळ्याच्या सुमारास असंख्य फुलपाखरे फुलझाडांवर बागडताना आढळतात. या वेळी नरमादीचे मिलन होते व मादी झाडांच्या पानांवर अंडी घालते. फुलपाखरांच्या वाढीच्या किंवा रूपांतरच्या अंडी, अळी, कोष व फुलपाखरू अशा चार अवस्था आहेत.
अंड: एक लहानशी सुरुवात
फुलपाखराची मादी मिलनानंतर लगेचच तिला हवे असलेले झाड शोधते व त्यावर अंडी घालते. विशिष्ट प्रजातींची फुलपाखरे ही काही विशिष्ट प्रकारच्या झाडांवरच अंडी घालतात. प्रत्येक जातीच्या फुलपाखरांचे 'होस्ट प्लांट' ठरलेले असते. फुलपाखरे आपली अंडी शक्यतो पानांच्या खालच्या बाजूला किंवा पानांच्या बेचक्यात अशी घालतात असतात जेणेकरून ती शिकाऱ्यांची भक्ष्य होऊ नयेत, किंवा जोरदार वाऱ्याने अथवा पावसाने ती उडून किंवा धुवून जाऊ नयेत, आणि पुढे अंड्यांमधून बाहेर पडणाऱ्या अळ्यांना अन्न मिळविण्यास सहसा त्रास पण होऊ नये. काही फुलपाखरे ही एका वेळी एक अंड घालतात तर काही समुहाने अंडी घालतात.
मादी तिच्या आयुष्यात १०० ते ५०० अंडी घालते. अंड्यांचा रंग पांढरा, पिवळट अगर विटकरी असू शकतो. त्यांचा आकार गोल, चपटा अगर अर्धवर्तुळाकार असतो, काही अंड्यांच्या कवचावर एक प्रकारचे नक्षीकाम आढळते. अंड्याचा आकार, रंग आणि घडण प्रत्येक प्रजातीप्रमाणे वेगवेगळी असते. काही फुलपाखरांची अंडी १ ते २ दिवसांत फुटतात, तर काहींची १० ते ३० दिवसांनी फुटून त्यांतून अळी किंवा सुरवंट बाहेर पडतो. ही दुसरी जीवनावस्था आहे. अळी अंड्यावरील कवच आपल्या जबड्यांनी फाडते व ते खाऊन झाल्यानंतर झाडांवरील पाने खाण्यास सुरूवात करते.
लार्व्हा: भुकेलेली अळी किंवा सुरवंट
अंड्यांमधून डिंभ/अळी किंवा सुरवंट त्याच अंड्याचे कवच खाऊन बाहेर पडल्यापासूनच खूप खादाड असतो. कोवळ्या पानांचा, कळ्यांचा, फुलांचा तो अक्षरशः फडशा पाडायला तो सुरुवात करतो. ह्या सुरवंटांचे सुद्धा आपापल्या प्रजाती प्रमाणे वेगवेगळे आकार आणि रंग असतात. काही मांसल तर काही केसाळ असतात. केसाळ असलेली बहुतांशी सुरवंट हि फुलपाखराची नसून पतंगाची असतात.
आणखीन एक नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे, सगळीच सुरवंट काही शाकाहारी नसतात!! काही प्रजातींमधली सुरवंट मावा किडीवर किंवा मुंग्यांची अंड्यांवर सुद्धा फडशा मारतात.
सुरवंट एकूण चार वेळा कात टाकतो. प्रत्येक वेळी कात टाकल्यावर त्याच्या शरीराची वाढ होते व केव्हा केव्हा त्वचेचा रंगही बदलतो. हि अवस्था साधारण ३ ते ८ आठवड्यांची असते. यानंतर सुरवंटाचे कोशात रूपांतर होते.
प्युपा: रूपांतरणाचा काळ, कोष
कोशात रूपांतर होण्यापूर्वी पूर्ण वाढ झालेला सुरवंट अन्न खाणे थांबवून कोशावस्थेत पडून राहण्यासाठी सोयीस्कर जागा शोधतो. सुरवंटाची वाढ पूर्ण झाली की तो झाडावर एखादी सुरक्षित जागा शोधतो आणि त्या जागी स्थिर होते. कोश बनण्याच्या सुमारास सुरवंट एका जागी सुस्तपणे पडून राहतो. त्याच्या कातडीचा रंग गडद होतो. शरीर आखडले जाऊन फुगीर बनते. जुन्या त्वचेखाली नवीन त्वचा निर्माण होते व जुनी त्वचा नव्या त्वचेपासून सुटी होते. काही वेळाने सुरवंटाचे कोशात रूपांतर होते. कोश बहुधा पानांना चिकटविलेले असतात.
प्युपा किंवा क्रायसॅलिस, हा फुलपाखराच्या जीवनातील सर्वात रहस्यमय टप्पा आहे. सुरवंट स्वतःभोवती कोष करत असताना त्याचे त्वचा, पाय आणि मुख हे अवयव गळून पडतात. कोषामध्ये राहण्याचा काळ हा १ आठवड्यापासून ते काही महिन्यांपर्यंत असू शकतो. हा काळ सभोवतालच्या वातावरणावर खूप अवलंबून आहे.
फुलपाखरू: नवीन सुरुवात
कोषात असतानाच सुरवंटाचे रूपांतर फुलपाखरात होऊ लागते. पूर्ण वाढ झाली आणि अनुकूल वातावरण मिळाले की फुलपाखरू त्या कोषाला भेग पाडून बाहेर येते. बाहेर आल्यानंतर त्याचे पंख ओलसर आणि दुमडलेले असतात. बाहेर आल्यानंतर फुलपाखरू काही काळ स्थिरावते. त्यादरम्यान, त्याच्या पोटात असलेले पाणी ते पंखांमध्ये ढकलत असते. हे होत असताना, फुलपाखराचे पंख हळूहळू मोठं होत असलेले दिसतात. पंख पूर्णपणे मोठे झाल्यावर पंखांची हालचाल सुरू होते. ज्यामुळे पंख कोरडे आणि सरळ होण्यास मदत मिळते. आणि सरतेशेवटी, आपली पुढची पिढी तयार करण्यासाठी ते हवेत झेप घेते.
स्थलांतर
कित्येक जातींची फुलपाखरे टोळांप्रमाणे एका भागातून दुसऱ्या भागात, केव्हा केव्हा एका देशातून दुसऱ्या देशात स्थलांतर करतात. अशी स्थलांतरे बहुधा ठराविक ऋतूत दक्षिणेकडून उत्तरेकडे केली जातात. फुलपाखरे आपल्या आयुष्यात एक ते दोन वेळा स्थलांतरे करतात. स्थलांतर करण्यापूर्वी हजारो फुलपाखरे एकत्र जमून हवेत एकदम उड्डाण करतात. ही फुलपाखरे हवेत तासनतास उडत राहतात व डोंगर, नद्या, समुद्र इ. अडथळे सहज पार करू शकतात. एरवी उडताना फुलपाखरे फार उंचीवरून उडत नाहीत त्यामुळे त्यांचे पंख गवताला अगर पानांना घासले जाऊन मोडतात परंतु स्थलांतराच्या वेळी फुलपाखरे बऱ्याच उंचावरून उडत असल्याने त्याच्या पंखांना काहीही इजा न होता ती सुखरूप प्रवास करू शकतात. भारतात पिरीडी या कुलातील कॅटोप्सिला व पिरीस या वंशांची फुलपाखरे व निंफॅलिडी या कुलातील डनायस व व्हॅनेसा या वंशांची फुलपाखरे नियमितपणे हिमालयातील थंड प्रदेशाकडे स्थलांतर करतात.
फुलपाखरं आणि पतंग मधला फरक:
- फुलपाखरे दिवसा संचार करतात व रात्री विश्रांती घेतात. त्यांच्या शृंगिका नेहमी तोंडासमोर धरलेल्या असतात. हे कीटक फुलांवर बसले म्हणजे त्यांचे चारही पंख एकास एक जुळून त्यांच्या पाठीवर सरळ उभे राहतात. फुलपाखरे फार चपळ असतात.
- पतंग रात्री संचार करतात व दिवसा विश्रांती घेतात. त्यांच्या शृंगिका तोंडासमोर धरलेल्या नसतात. हे कीटक निश्चल बसले असता त्यांचे पंख एकाशी एक न जुळता तसेच पसरलेले राहतात व त्यामुळे त्यांचे शरीर झाकलेले राहते. पतंगांचे शरीर बोजड असल्याने त्यांची हालचाल फुलपाखरांसारखी चपळ नसते.
0 comments :
Post a Comment