अनेक फुलांना भेटी देऊन मधुरस किंवा मध प्राशन करतानाची फुलपाखरे आपण सर्वांनीच
बघितली असतील. पण, ह्या व्यतिरिक्त काही इतर कारणांसाठी फुलपाखरांना चिखलपान
करण्याची गरज भासते. या लेखामध्ये, आपण चिखलपान म्हणजे नक्की काय, त्याचे महत्व
महत्व काय आणि तुम्हाला हे दृश्य नेमके कुठे बघायला मिळू शकेल ह्याबद्दल अधिक
माहिती घेणार आहोत.
चिखलपान म्हणजे काय?
फुलपाखरे, विशेषत: नर, ओलसर माती, चिखल किंवा शेण अशा विघटित जैविक पदार्थावर
गोळा होऊन महत्वपूर्ण खनिजे आणि मीठ असलेल्या ओलाव्याचे सेवन करतात, ज्याला
चिखलपान असं म्हणतात. हे पोषक तत्वांचे सेवन फुलपाखरांच्या अस्तित्वासाठी,
प्रजनन प्रक्रिया आणि एकूण आरोग्यासाठी महत्वपूर्ण आहे. मधुरस फुलपाखरांच्या
ऊर्जेचा प्रमुख स्रोत असला तरी तो फुलपाखरांमधील काही आवश्यक पोषणतत्वांची
कमतरता भरून काढू शकत नाही. त्यासाठी चिखलपान फुलपाखरांच्या जीवनचक्राचा एक
प्रमुख भाग बनतो.
फुलपाखरे चिखलपान का करतात?
फुलपाखरे चिखलपान करण्याचे प्रमुख कारण म्हणजे सोडियम आणि अमीनो आम्लासारखी
खनिजे आणि मीठ मिळवणे, जी फुलांच्या मधात दुर्मिळ असतात. हि पोषक द्रव्ये
चयापचय प्रक्रियेत महत्वाची भूमिका बजावतात आणि विशेषत: नर फुलपाखरांसाठी हि
खास महत्वाची असतात. मिलनादरम्यान, नर फुलपाखरांमधून हि पोषक द्रव्ये मादीला
हस्तांतरित केली जातात, ज्याचा उपयोग अंड्यांच्या टिकाऊशक्तीला होतो, आणि
ज्यामुळे पुढे त्यांच्या प्रजातीचे अस्तित्व सुनिश्चित होते. हि पोषक द्रव्ये
विषारी पदार्थांच्या निर्मूलन प्रक्रियेत सुद्धा मदत करतात, ज्यामुळे
फुलपाखरांना चयापचय कचरा अधिक कार्यक्षमतेने बाहेर काढून टाकता येऊ शकतो.
चिखलपानाचे दृश्य कुठे बघता येऊ शकेल?
जंगलामधील झऱ्याजवळ, प्रवाहांजवळ, ओढ्यांजवळ असलेल्या ओल्या जमिनीवर किंवा
चिखलावर तुम्हाला फुलपाखरांची शाळा भरलेली दिसू शकते. हे समूह साधारणपणे
पावसानंतरच्या शांततेत हमखास पाहायला मिळतात. नाजूक मातीवर संतुलन साधताना,
फडफडणारी, वेगवेगळ्या जातीची अनेक प्रकारची फुलपाखरे एकाच जागी बघायला मिळणे,
हे एक मंत्रमुग्ध करणारे दृश्य आहे. चिखलपान उष्णकटिबंधीय वर्षावनापासून ते
समशीतोष्ण क्षेत्रांपर्यंत विविध नैसर्गिक अधिवासांमध्ये बघायला मिळू शकते.
सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधे विविध प्रकारची फुलपाखरे आढळतात. स्वोर्डटेल,
कॉमन जे, ब्लू बॉट्ल, इमीग्रंट, लेपर्ड अशी अनेक सुंदर फुलपाखरे असे चिखलपान
करताना तुम्हाला हमखास दिसतील. सतत उडत असलेल्या फुलपाखरांचे फोटो काढणे एरवी
सोप्पे काम नाही, अशावेळी एकाच ठिकाणी वेगवेगळ्या जातीच्या अनेक फुलपाखरांचे
चिखलपान करताना फोटो काढणे हि एक प्रकराची पर्वणीच म्हणायची. फुलपाखरांप्रमाणे
काही इतर कीटक सुद्धा अशाचप्रकारचे चिखलपान करताना आढळतात.
सह्याद्री मध्ये पावसाळ्या नंतर अनेक रानफुलं फुलल्यामुळे आणि ठिकठिकाणी
पाण्याचे साठे असल्यामुळे फुलपाखरांचे अनेक थवे दिसू लागतात. पण चिखलपान
बघण्याची अगदी हमखास संधी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये उपलब्ध असते. तापमान
वाढलेले असताना रानांत थोडे पाणी शिल्लक असलेल्या ओढ्यातील चिखलात चिखलपान
करताना फुलपाखरे आढळू शकतात. शक्यतो फिरायला जाताना - पाण्याच्या जवळील ओल्या
मातीत, पाऊलवाटेवर किंवा उघड्या मैदानात विशेष लक्ष ठेवा, फुलपाखरे अशा ठिकाणी
आकर्षित होतात.
सह्याद्रीतच काढलेला, ब्लू बॉटल जातीच्या फुलपाखरांचा चिखलपान करतानाचा हा
खालील व्हिडीओ:
0 comments :
Post a Comment