सामाजिक-सांस्कृतिक महत्व
स्थानिक समुदायांसाठी अध्यात्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या देवराया महत्वाची स्थळे आहेत. या ठिकाणी साजरे करण्यात येणारे उत्सव/ यात्रा/ जत्रा, विविध समाजातील लोकांमध्ये एकजुट आणि सामाजिक सद्भावना वाढवण्याचे काम करतात. स्थानिक प्रथेप्रमाणे, कोणीही देवराईतील झाडाची फांदी सुद्धा तोडत नाहीत. सुकलेल्या झाडाची काटकीही घरी घेऊन जात नाहीत. झाडावरचे किंवा झाडावरून खाली पडलेले फूलही देवाला वाहत नाहीत. ह्याच सामाजिक श्रद्धेतून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे या देवराईंचे संरक्षण होते.
त्याचबरोबर, देवराईतील पाण्याचा, बारमाही झऱ्यांचा उपयोग आजूबाजूच्या वाड्यावस्त्यांसाठी, गुराढोरांनाही होतो.
पर्यावरणीय महत्व
देवराईचे महत्त्व तिच्या आकारमानापेक्षा त्यात आढळणाऱ्या प्रजातींवर अवलंबून आहे. शेकडो वर्षांपासून जपल्या गेलेल्या देवरायांमध्ये कमालीची जैवविविधता बघायला मिळते. तिथे बरेच उगम पावणारे झरे, जलप्रवाह बारमाही असतात. काही प्रकारच्या वनस्पती तसेच प्राणी आता केवळ देवरायांतच आढळतात. महाराष्ट्रातील बहुसंख्य देवराया निमसदाहरित (semi evergreen) आणि पानझडी (deciduous) जंगल प्रकारच्या आहेत.
देवराईमध्ये आंबा, जांभूळ, उंबर, पळस, पांगारा, आपटा, बिब्बा सारखे उंच वृक्ष; जाड खोड असलेल्या व जमिनीवर पसरलेल्या कांचनवेल, पळसवेल, शिकेकाई सारख्या महावेली; डोंगर उतारावर धायटी, कारवी सारख्या वनस्पती; पावलं बुडतील इतका पाचोळ्याचा थर, त्यातून धावणारे प्राणी, सर्प, अनेक प्रकारचे कीटक, फुलपाखरे, पक्षी, विविध प्रकारची कवके, बुरशी, भूछत्र्या, वनस्पती, नेच्यांचे अनेक प्रकार, बांडगुळ प्रकारातली ऑर्किड्स इत्यादी आढळू शकतात. सर्वेक्षणांनुसार प्राण्यांच्या अनेक दुर्मिळ, नष्ट होत असलेल्या प्रजाती आज फक्त देवरायात आढळतात. आयुर्वेदिक औषधी वनस्पतींची उपलब्धता हे सुद्धा देवरायांचे एक वैशिष्ट्य मानले जाते.
देवराई मध्ये असणाऱ्या मोठाल्या वृक्षांच्या खोलवर पसरलेल्या मुळांमुळे, पाणी सहजतेने जमिनीत शिरून जलस्रोतांना जाऊन मिळते ज्यामुळे भूगर्भ जलस्तर सुधारण्यासाठीही ह्या देवरायांची खूप मदत होते.
संरक्षणाची आव्हाने
वाढते औद्योगिकीकरण, शहरीकरण आणि कृषी क्षेत्रांमधल्या वाढीमुळे, देवरायांवर येणारा दबाव वाढत आहे. श्रद्धेमुळे (किंवा अंधश्रद्धेमुळे का होईना) पूर्वी देवरायांना मिळालेले संरक्षण आता नाश होऊ बघतंय. बऱ्याच ठिकाणी देवरायांमध्ये अतिक्रमण झालेली दुर्दैवाने बघायला मिळत आहेत, ज्यामुळे आत्तापर्यंत टिकलेल्या जैवविविधतेचं आणि पर्यावरणाचं अस्तित्व धोक्यात आलंय. देवराईचा सांभाळ वनखाते करीत नाहीत तर स्थानिक समाज ही जबाबदारी घेतो. त्यामुळे ह्या समस्यांचा सामना करण्यासाठी, स्थानिक समुदाय, सरकारी संस्था आणि पर्यावरण संघटना यांनी एकत्र येऊन देवरायांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याच्या उपाययोजना करण्याची गरज आहे.
देवराई हे नैसर्गिक जैवविविधतेच्या संरक्षणाचे एक उत्तम मॉडेल म्हणून आणि एक उपयुक्त जनुक पेढी (gene bank), बीज पेढी (seed bank) आणि जल पेढी (water bank) म्हणून कार्य करू शकतात. आपण सर्वांनीच देवराईंचे महत्व समजून घेऊन, त्यांच्या संरक्षणासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे, ज्यामुळे आपल्या भावी पिढ्यांना ही अमूल्य संपत्ती पुढेही बघता येईल.
0 comments :
Post a Comment