कसा पडतो मान्सूनचा पाऊस?
वर्षाच्या विशिष्ट ऋतूत नैर्ऋत्य दिशेकडून भरपूर पाणी घेऊन येणाऱ्या वाऱ्यांना आपण नैर्ऋत्य मोसमी वारे किंवा मान्सूनचे वारे म्हणतो आणि त्यामुळे पडणाऱ्या पावसाला मोसमी पाऊस. भारताची भॊगोलिक रचना लक्षात घेतलीत तर आपल्याकडे तीन बाजूने समुद्र आहे आणि उत्तर दिशेला जमीन. आपल्याला माहीतच आहे कि, वाऱ्यांचा प्रवास नेहमी उच्च-दाबाच्या पट्ट्यांपासून कमी-दाबाच्या पट्ट्यांपर्यंत होत असतो. उन्हाळ्यात भारतीय उपखंडावर सूर्याची किरणे तीव्रतेने पडतात, आणि साहजिकच समुद्राच्या तुलनेत जमीन जास्त तापते ज्यामुळे जमिनीवरील हवा गरम होऊन प्रसरण पावते. ही हलकी झालेली गरम हवा वर उठते आणि त्यामुळे जमिनीवर कमी दाबाचा पट्टा तयार होतो, ज्याला 'थर्मल लो' असं म्हणतात. याच काळात जमिनीवरील तापमानाच्या तुलनेत समुद्राचे तापमान कमी राहते, आणि थंड असलेल्या समुद्राच्या पृष्ठभागावर हवेचा दाब जास्त राहतो. या दाबातील फरकामुळे समुद्रावरील आर्द्र हवा कमी दाब असलेल्या जमिनीकडे खेचली जाते.
समुद्र सपाटीपासून १४,००० फूट उंचीवर असलेल्या तिबेटच्या पठारावर निर्माण होणारे कमी-दाबाचे क्षेत्र आणि मादागास्करच्या पूर्वेस हिंदी महासागरावर असलेल्या उच्च-दाबाचे क्षेत्र, ह्यांची तीव्रता प्रामुख्याने नैऋत्य मौसमी वाऱ्यांच्या प्रवासावर परिणाम करते.
पश्चिम घाट, भारतातील एक प्रमुख पर्वतरांग, नैऋत्य मोसमी पावसाच्या प्रवाहाचे नियंत्रण करण्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाची भूमिका बजावते. ही पर्वतरांग कोकण किनारपट्टीपासून केरळपर्यंत पसरलेली आहे. जेव्हा मोसमी पावसाची हवा पश्चिम घाटांना धडकते, तेव्हा ती आडवी पसरून वर उठते आणि थंड होते. थंड झालेल्या हवेची बाष्पयुक्त पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी झाल्याने हवेतील ओलावा संघनित होऊन पाऊस पडतो. या प्रक्रियेला 'ओरोग्राफिक लिफ्टिंग' असे म्हणतात. पश्चिम घाटामुळे महाराष्ट्रातील कोकण, कर्नाटक आणि केरळमध्ये अतिशय मुसळधार पाऊस पडतो.
भारतीय उपखंडात ही क्रिया साधारणपणे मेच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत निरंतर सुरू असते. जून ते सप्टेंबर हा काळ नैर्ऋत्य मौसमी पावसाचा म्हणून ओळखला जातो.
0 comments :
Post a Comment